मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण मनोरंजन मसाल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्याचे बहुतांश सिनेमे सुपरडुपर हिट आहेत. बॉलिवूड मध्ये तसे त्याचे सिनेमे बोटावर मोजण्याइतकेच असतील. तब्बल २४ वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी बॉलिवूड मध्ये सिनेमा केला होता. परंतु आता तो लवकरच हिंदी सिनेमांमध्ये दिसेल.
रजनीकांत बॉलिवूड निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या सिनेमात झळकणार आहे. सध्या या दोघांमध्ये आगामी सिनेमाची चर्चा सुरु असून ही माहिती खुद्ध साजिद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. “दिग्गज रजनीकांत यांच्यासोबत काम करणं अभिमानास्पद आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात आम्ही एकत्र करत आहोत, असं कॅप्शन देत साजिद यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, यापूर्वी रजनीकांत रोबोट या सिनेमात झळकला होता. हा सिनेमा २०१० मध्ये रिलीज झाला होता. रजनीकांत हा दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. रजनीकांत एका सिनेमासाठी १०० कोटींपेक्षा कमी मानधन घेत नाहीत. त्यामुळे आगामी बॉलिवूड सिनेमासाठी ते किती मानधन स्वीकारणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे.