अहमदनगर। नगर सहयाद्री
रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याप्रकरणी महापालिकेने बांधकाम व्यावसायिक आशीष पोखरणा यांना ६ हजार रुपयांचा दंड केला आहे. टीव्ही सेंटर येथील इमारतीच्या बांधकाम स्थळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी पाहणी केली होती. त्यानंतर सावेडी प्रभाग कार्यालयाने ही कारवाई केली.
दरम्यान, याच इमारतीसमोर जुने झाड विनापरवाना तोडल्याप्रकरणी वृक्ष प्राधिकरण समितीने पोखरणा यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार मनपाने पाहिलीच कारवाई केली आहे.
टीव्ही सेंटर येथे पोखरणा यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे बांधकाम साहित्य, वीटा, खडी रस्त्यावर टाकण्यात आली. बुधवारी सायंकाळी आयुक्त जावळे सावेडी प्रभाग कार्यालयात जात असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी सावेडी प्रभाग कार्यालयाला कारवाईचे आदेश दिले. इमारतीसमोरील झाड तोडल्याप्रकरणी वृक्ष प्राधिकरण समितीने १० हजार रुपयांचा दंड केला आहे. याबाबत संबंधिताना नोटीस बजावल्याचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले.