मुंबई। नगर सहयाद्रीकोरोना काळातील कथित खिचडी वितरण गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना ईडीने १७ जानेवारीला अटक केली. या घडामोडी घडताना आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांचा अभिमान वाटत असल्याचे नमूद केले आहे.
कोरोना काळात वाटपासाठी खिचडीचा दर्जा आणि त्याचे प्रमाण घटवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेतील भाषणात या मुद्याचा उल्लेख करून ठाकरे गटाला लक्ष्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते.
या घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्या अनुषंगाने अटकेची कारवाई केली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असून त्यांना झालेली अटक आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
चव्हाण यांना अटक केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये सूरज चव्हाण यांच्यावरील कारवाईचा निषेध केला आहे. निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणार्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. सूरज चव्हाण हे कायम सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या राज्यघटनेसाठी उभे राहिले आहेत. सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले.
त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या कालखंडाशी लढा देऊ आणि विजयी होऊ. आपल्या राज्यातील हुकूमशाही सत्तेच्या कृती जग पाहात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. चव्हाण यांना अटक केली असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या राजन साळवी यांच्या घरी आज सकाळीच भ्रष्टाचार विरोधी पथकाने धाड टाकली. या पथकामार्फत त्यांची चौकशी करण्यात आली.