पश्चिम बंगाल / नगर सह्याद्री : देशभर गाजलेले दिव्या पाहुजा मॉडेल हत्याकांडाने सगळीकडे खळबळ उडवून दिली होती. आता दिव्याचा मृतदेह 11 दिवसांनंतर कालव्यात सापडला आहे. पश्चिम बंगालमधून बलराज नावाच्या आरोपीस अटक करण्यात आली होती.
त्याच्या चौकशीनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे. दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलं. पोलिसांनी गुरुग्रामची मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे 25 सदस्यीय पथक पटियाला येथे पोहोचले होते. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती. मात्र दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील टोहाना कालव्यात सापडला.
पोलिसांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुग्राम गुन्हे शाखेच्या सहा टीम मृतदेहाचा शोध घेत होते. 2 जानेवारीला गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलमध्ये दिव्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंह याने ही घटना घडवली.
याप्रकरणी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या आरोपीची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलं. दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या टोहाना कालव्यात फेकून दिल्याचं बलराजने पोलिसांना सांगितलं होतं. खरं तर दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजीत सिंह याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बलराज गिल याच्याकडे सोपवली होती.