जम्मू-काश्मीर / वृत्तसंस्था –
किश्तवाड जिल्ह्यातील चसोटी गावात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर शोध आणि बचाव ऑपरेशनचा आज तिसरा दिवस आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12.25 वाजता झालेल्या या ढगफुटीमुळे मलब्याखाली दबून आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 34 मृतदेहांची ओळख पटली असून, 200 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 180 जण जखमी झाले असून, त्यापैकी 40 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना किश्तवाड आणि जम्मू येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 75 जणांचे तपशील त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला दिले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये NDRF च्या 3 तुकड्या, लष्कराचे 300 हून अधिक जवान, व्हाइट नाइट कोर मेडिकल टीम, पोलिस, SDRF आणि इतर यंत्रणा कार्यरत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि स्थानिकांचा संताप –
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज चसोटी गावाला भेट दिली आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावेळी एका तरुणाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, “आम्हाला काही नको, तुम्ही सर्व घरी जा. आम्हाला फक्त आमच्या मृत नातेवाईकांचे मृतदेह द्या. माझी आई आणि मावशी बेपत्ता आहेत.” या तरुणाने प्रशासनावर गंभीर आरोप केले की, “20 JCB यंत्रे आणली गेली, पण फक्त 2च काम करत आहेत. नेते येतात तेव्हाच ही यंत्रे सुरू केली जातात.”
मचैल माता यात्रेदरम्यान घडली दुर्घटना –
ही दुर्घटना मचैल माता तीर्थयात्रेच्या वेळी घडली, जेव्हा हजारो भाविक किश्तवाडच्या पड्डर उपविभागातील चसोटी गावात पोहोचले होते. हे गाव यात्रेचा पहिला टप्पा आहे. येथे भाविकांच्या बस, तंबू, लंगर आणि अनेक दुकाने होती, जी सर्व पुरात वाहून गेली. चसोटी गाव किश्तवाड शहरापासून सुमारे 90 किमी अंतरावर आहे आणि मचैल माता मंदिराच्या मार्गावर आहे. हे पड्डर खोऱ्यात वसलेले असून, येथील डोंगर 1,818 ते 3,888 मीटर उंचीचे आहेत. या उंचीवर ग्लेशियर आणि उतारांमुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होतो.
मचैल माता तीर्थयात्रा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात होते आणि यंदा ती 25 जुलै ते 5 सप्टेंबर या कालावधीत आहे. या यात्रेसाठी हजारो भाविक येतात. जम्मू ते किश्तवाड हा 210 किमीचा रस्ता आहे, तर पड्डर ते चसोटी 19.5 किमी रस्त्याने आणि त्यानंतर 8.5 किमी पायी प्रवास करावा लागतो.
न्यूज एजन्सी PTI नुसार, या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत भयावह आहे. मलब्याखाली दबलेल्या मृतदेहांवर रक्ताचे डाग आणि फुफ्फुसात चिखल भरलेला आढळला. अनेकांचे अंग तुटलेले आणि अंग फाटलेल्या अवस्थेत सापडले. स्थानिक, लष्कर आणि पोलिसांनी अथक परिश्रम करत जखमींना चिखलातून खणून काढले आणि खांद्यावर लादून रुग्णालयात पोहोचवले.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, “या दुर्घटनेत आपण अनेकांना गमावले आहे. अनेकजण बेपत्ता आहेत. आमचे संपूर्ण लक्ष रेस्क्यू ऑपरेशनवर आहे. या कठीण काळात आम्ही पीडितांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”