ठेवीदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर चेअरमन रामदास भोसले यांची समर्पक उत्तरे
सेनापती बापट पतसंस्थेचा मेळावा पारनेर येथे संपन्न
संस्थापक माजी आमदार विजय औटी यांची अनुपस्थिती
कशा पद्धतीने देणार ठेवीदारांच्या ठेवी
पारनेर/प्रतिनिधी :
आर्थिक अनियमितेत सापडलेल्या पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांच्या मेळाव्यात ठेवीदारांच्या प्रश्नांच्या सरबत्ती वर संस्थेचे चेअरमन रामदास भोसले आजारी असून ही त्यांनी शांतपणे समर्पक उत्तरे दिल्याने व संस्थापक, माजी आमदार विजयराव औटी यांच्या अनुपस्थित सुरू झालेला मेळावा अखेर शांततेत पार पडला.
यावेळी चेअरमन रामदास भोसले म्हणाले की, सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्था पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील २०० कोटी रुपये ठेवी असलेली पतसंस्था, अलीकडच्या वर्षभराच्या कार्यकाळात आर्थिक अनियमितता व तालुक्यातील डबघाईस आलेल्या इतर पतसंस्थांमुळे ठेवीदारांनी एकाच वेळी व तीही अचानकपणे ठेवींची मागणी केली व मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करण्यात आल्याने संस्था स्वतः जास्तीत जास्त ३० कोटी रुपये संस्थेत ठेवू शकते. पण अचानक मागणी वाढल्याने एकदम एवढी मोठी रक्कम देवू शकत नाही . त्यामुळे तरी पण टप्प्या टप्प्याने सर्वांचे पैसे देण्यात येतील, घाबरण्याचे कारण नाही. कर्ज वसूली जोरात सुरू आहे. संस्था मल्टीस्टेट असल्या कारणाने संस्थेला सहकार कायदा ९७ अन्वये कारवाई करण्याचा अधिकार असल्याने प्रथम थकीत कर्जदाराचे संस्थेतील खाते बंद करून २१ दिवसांत त्याच्या मालमत्तेवर टाच आणता येवू शकते. असे चेअरमन भोसले म्हणाले व पुढे ते म्हणतात की,
मंगळवार दि . १ ऑक्टोबर पासून संस्थेच्या २८ शाखा पुन्हा सुरू करण्यात येतील, बंद ठेवल्या तर सर्वांचे व्यवहार बंद होतील. त्यातून अडचणी उभ्या राहतील. ठेवींच्या शेकडा ५ टक्के रक्कम टप्प्या टप्प्याने देण्यात येणार आहे. आज अखेर ३८ कोटी रुपये ठेवीदारांच्या ठेवी वाटल्या आहेत. मी मित्र मंडळी कडून ९ ते १० कोटी घेवून वाटले आहेत. संस्थेने संचालक व कर्मचारी यांना अगदी थोड्या प्रमाणावर कर्जे वाटली आहेत त्यांनी ते भरले ही आहेत. त्यामुळेच ठेवीदारांना थोड्या फार ठेवी देता आल्या .उलट या संचालक व कर्मचाऱ्यांना कर्ज वाटप केले असते तर वसूलीला अडचण आली नसती. यांच्यापेक्षा जास्त कर्जे इतर कर्जदारांना वाटली आहेत. हे कर्जदार जस जसे कर्जाचे हप्ते संस्थेत भरतील, तसतसे ठेवीदारांना ठेवींचे वाटप करतो. या कामी कर्जदारांनीही मदत करावी.
पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात सेनापती बापट पतसंस्थेने इतर संस्थांपेक्षा जास्त मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. त्या आज विकली तर त्यातून अपेक्षित रक्कम उभी राहत नाही, पण येत्या ६ महिन्यात त्या विकून त्यातून ५० कोटी रुपये उभे करून पैसे देण्यात येतील. ठेवीदारांनी सहकार्य करावे मंगळवार दि . १ पासून दररोज ५० ठेवीदारांना थोडे थोडे पैसे देण्यात येतील. संस्थेच्या प्रत्येक शाखेत ५ ठेवीदारांनी एकत्र येऊन समिती स्थापन करावी व त्यांनी ठरवावे, प्रथम टप्प्या टप्प्याने कोणाला ठेवी द्यायच्या. येत्या १ वर्षाच्या आत संस्था अडचणीतून बाहेर काढू असा विश्वास ही चेअरमन रामदास भोसले यांनी व्यक्त केला.
मी सर्वांचे पैसे देणार..
सर्व ठेवीदारांचे पैसे दिल्याशिवाय मी मरणार नाही व पळून ही जाणार नाही. मी आजारी असून माझी सर्जरी झालेली आहे , तरी मी या मेळाव्याला उपस्थित राहिलो आहे . ही संस्था माजी आमदार विजयराव औटी यांनी स्थापन केलेली असून त्यांचा संस्थेशी संबंध असल्याचेही चेअरमन रामदास भोसले यावेळी म्हणाले
ठेविदार म्हणाले कष्टाचे पैसे द्या
या मेळाव्यात तरुण, वयस्कर पुरुष, महिला ठेवीदार खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याने अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. पारनेर बसस्थानकापासून ते पानोली रोड वरील गणेश मंगल कार्यालया पर्यंत ठेवीदारांचे जत्थेच्या जत्थे रस्त्याने पायी चालताना दिसत होते. ठेवीदार कोणी ही रिकाम्या हाताने आले नव्हते, प्रत्येकाच्या हातात कागद पत्रे, दवाखान्याचे रिपोर्ट, लग्न पत्रिका, ठेवींच्या पावत्या, मागणी अर्ज घेवून चेअरमन रामदास भोसलेंशी भेटून आपल्या कष्टाचे पैसे लवकरात लवकर मिळावे, म्हणून अगदी पोट तिडकीने म्हणणे मांडत होते. तर चेअरमन भोसले ही त्यांना आश्वस्त करीत होते.
संस्थेचे संस्थापक माजी आमदार विजय औटी यांची अनुपस्थिती
सकाळी १०.३० वाजता सुरू होणारा हा मेळावा प्रत्यक्षात ११ वाजता संस्थेचे संस्थापक, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार विजयराव औटी यांच्या अनुपस्थितीत सुरु झाला. त्यांची अनुपस्थितीत नजरेत भरत होती. त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणे, गरजेचे होते. असे ही अनेक सभासद ठेवीदारांनी खाजगीत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर चेअरमन भोसले यांनी उत्तर देत हा मेळावा योग्य पद्धतीने हाताळल्याने होणारा गडबड गोंधळ टळला गेला. त्यांनी ही अत्यंत गोड बोलत, आश्वासन देत सभासद ठेवीदारांकडून मुदत वाढीचे गाजर दाखवत पुढील ६ महिने ते १ वर्षे हा विषय प्रलंबित ठेवला आहे.
…