मुंबई । नगर सहयाद्री:-
जीएस महानगर को-ऑप. बँकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईतील ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महात्मा गांधी सभागृह’ येथे उत्साही वातावरणात पार पडली. या वर्षीच्या आर्थिक अहवालानुसार,जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मागील वर्षापेक्षा १०.०० कोटीने वाढवून रू.३०.०० कोटी इतका झालेला आहे. तसेच बँकेस सातत्याने “अ” ऑडीट वर्ग प्राप्त झालेला आहे.
बँक नक्त एनपीएचे (Net NPA) प्रमाण शुन्य टक्के राखण्यात यशस्वी झालेली असून यापुढेही एनपीएचे प्रमाण शुन्य राखण्याचा मानस आहे. तसेच बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ठेवी रू.२,८८५/- कोटी, एकूण कर्ज रू.१,५७४/- कोटी असा एकूण रू.४,४५९/- कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून बँकेची गुंतवणूक रू.१४९५/- कोटी इतकी आहे.
बँक सर्व स्तरावर नेत्रदिपक कामगिरी करीत असून बँकेचा लौकीक व विश्वासर्हतता बँकेने कायम टिकवून ठेवलेली आहे. तसेच बँकेच्या भव्य अशा स्वमालकीच्या ९ मजली नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या ईमारतीचे स्वर्गीय सॉलि. गुलाबराव शेळळे साहेबांचे स्वप्न साकार होत असून लवकरच बँकेचे प्रशासकीय कार्यालय सदर जागेत स्थलांतरीत होत आहे, अशी माहिती जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिली.
तसेच सदर सभेमध्ये संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार सर्व सभासदांना त्यांच्या भागभांडवल रकमेवर १० टक्के लाभांश जाहिर केलेला आहे. तसेच बँकेचे सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्या सक्रिय सहकार्याने ही प्रगती शक्य झालेली असून त्या सर्वांचे व बँकेचे अधिकारी/कर्मचारी/दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांनी बँकेच्या वतीने आभार व्यक्त केले.