अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर जिल्ह्यातील एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची एका अनोळखी महिलेने ५० लाख १ हजार ३७९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विकास वसंतराव कुलकर्णी (वय ६२, रा. शिर्डी, ता. राहाता) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी (दि.९ जानेवारी) सायंकाळी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे सेवानिवृत्त असून शिर्डी येथे राहतात. एक दिवस ते मोबाईल वर व्हॉट्सअप पाहत असताना एका ग्रुपवर त्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक कशी करायची, त्यातून अधिक नफा कसा मिळवायचा याबाबतची लिंक आली व त्यावर त्यांनी क्लिक केले असता त्यांचा कांचन नावाच्या एका महिलेचा नंबर वर संपर्क झाला. त्या कांचन नावाच्या महिलेने फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअप वर शेअर ट्रेडींग बाबत माहिती सांगून तिने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे फिर्यादी कुलकर्णी यांनी त्यांच्या बँक खात्यातून दि.१२ एप्रिल २०२४ ते १७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन ५० लाख १ हजार ३७९ रुपयांची रक्कम पाठवली.
दरम्यान, त्यानंतर फिर्यादी यांनी कांचन हिला गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी विचारणा केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे देत त्यांच्याशी संपर्क बंद केला. अनेक वेळा संपर्क करूनही संपर्क न झाल्याने आणि गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने कांचन नावाच्या या अनोळखी महिलेने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि.९ जानेवारी) सायंकाळी नगरमध्ये येवून सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कांचन नावाच्या महिलेविरोधात भा.दं.वि. कलम ४१९, ४२० सह आयटी अॅक्ट कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे करीत आहेत.