सोलापूर / नगर सह्याद्री :
देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना सोलापूरमध्ये झाली आहे. क्रूझरचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी उलटली. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूरमधील सरकारी रूग्णालयात दाखल केले आहे. अपघातामधील सर्व भाविक हे सोलापूरजवळच्या उळे या गावातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदुर गावाजवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर अपघातामध्ये सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण उळे येथील असल्याचे प्राथमिक माहिती. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
सोलापूरकडून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी गाडी जात होती. त्यावेळी अचानक क्रुझरचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे क्रुझर पलटी झाली अन् ट्रॅक्टरला जाऊन जोरात धडकली. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदत पोहचवली. पोलिसांनी घटनास्थाळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. पाच जणांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहे.



