खासदार संजय राऊरत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवली फाईल; भ्रष्टाचार्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी
मुंबई | नगर सह्याद्री
अहिल्यानगर महानगरपालिकेत संगणमत करत कटकारस्थान रचून अहिल्यानगर शहरातील सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीत ७७६ रस्त्यांच्या सुमारे ३५० ते ४०० कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केला आहे. हा अहिल्यानगर मधील सर्वात मोठा स्कॅम आहे. त्या संदर्भात शहर प्रमुख किरण काळे यांनी मुख्यमंत्री, अँटी करप्शनकडे, जिल्ह्यातील या संदर्भातील संबंधित अधिकार्यांकडे मागील दोन वर्षांपासून तक्रार, पाठपुरावा करत आहेत.
प्रशासक, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून अहिल्यानगरची महानगरपालिका हे या महाराष्ट्रातील दरोडेखोरीच एक उत्तम नमुना आहे. त्याची चौकशी व्हावी यासाठी काळे यांनी निवेदनं दिली, तक्रारी केल्या. तरी देखील भ्रष्टाचार्यांवर कारवाई होत नाही. म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह या स्कॅमची फाईल पाठवली आहे. जर मुख्यमंत्री अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाया करत नसतील तर शिवसेना त्यांना सोडणार नाही असे खा. राऊत म्हणाले.
या स्कॅम संदर्भात काळे यांनी मंगळवारी मुंबईत खा. राऊत यांची समक्ष भेट घेत या संदर्भातील पुराव्यांची फाईल त्यांना दिली होती. त्यानंतर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित ती फाईलच सरकारला दिली. मुंबईत बुधवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची व आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात महाराष्ट्रात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महापालिकेतील प्रशासक व अधिकारी संगणमताने शासकीय तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रकरण धक्कादायक आहे.
हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. ८ मे २०२३ रोजी त्यांनी पहिली तक्रार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, तत्कालीन महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती.
काळे यांच्या तक्रारीवरून आणि केलेल्या आंदोलनानंतर शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर यांनी १६ जून २०२३ रोजी पाच सदस्य समिती गठीत केली. या समितीने सर्व उपलब्ध कागदपत्र, पुरावे यांची सखोल पडताळणी केली असता सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांची शेकडो कोटींची बिले लाटण्यासाठी संगणमताने महाघोटाळा केला आहे.
तीनशे कोटींचे कामच नाही, मग घोटाळा कसा? आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर महानगरपालिकेत ३०० ते ४०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली. मात्र, त्यांच्या या गंभीर आरोपावर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी ठामपणे फोल ठरवत वस्तुस्थिती मांडली आहे. डांगे यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची बोगस कामे तसेच बोगस बिल देण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही. तीनशे कोटींचे कामच नाही, मग घोटाळा कसा असे ते म्हणाले आहेत.
सन २०२० ते २०२३ या काळातही मोठा स्कॅम
या चार वर्षां व्यतिरिक्त सन २०२० ते २०२३ या कालावधीत देखील अशाच प्रकारच्या मोड ऑफ ऑपप्रेंडस – कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांच्या तितयाच रकमेचा घोटाळा झाला असण्याची दाट शयता असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत देखील तक्रार करूनही कोणतीही चौकशी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार दडपण्याच्या हेतूने करण्यात आलेली नाही.
तात्काळ गुन्हे दाखल करा
अहिल्यानगर शहराचे नागरिक रस्त्यांच्या समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. सरकार त्यांना रस्ते ही देऊ शकत नसेल तर अशा सत्तेचा काय उपयोग. गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील आरोपींची संख्या ही प्रचंड मोठी आहे. जनतेची लूट करणार्या आपल्या सरकारच्या वरदहस्ताने अशा साखळी पद्धतीने भ्रष्टाचार करणार्या भ्रष्टाचारांची जागा ही तुरुंगात असायला हवी, असे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. अहिल्यानगरच्या जनतेच्या व्यापक जनहितार्थ आपण या तक्रारीची दखल घेत तात्काळ सर्व दोषींवर उपलब्ध चौकशी अहवालाच्या आधारे गंभीर स्वरूपाचे फौजदारी खटले दाखल करून दोषींना तात्काळ अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे खा. संजय राऊत यांनी केली आहे.