श्रीरामपुर । नगर सहयाद्री
श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एका औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडून मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील खंडाळा येथील एका मेडिकलवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली, सदरच्या कारवाईत सुमारे १५ हजार रुपये किंमतीच्या मेफेंटरमिन इंजेक्शनच्या ४० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला खंडाळा परिसरात शिव मेडिकलमधून नशेसाठी वापरली जाणारी मेफेंटरमिन इंजेक्शन्स विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, आणि अन्न – औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करत २१ वर्षीय पंकज चव्हाण नावाच्या औषध विक्रेत्यास ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी इंजेक्शनच्या बाटल्यांसह एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी पंकज चव्हाण याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, १२५, आणि २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल द्वारके, विजय पवार, चंद्रकांत कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर,रमिजराजा अत्तार,पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड आदींच्या पथकाने केली असून. नशेचे इंजेक्शन विकून युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
अवैधरित्या शेड्यूल ‘एच’ किंवा इतर प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे श्रीरामपूरातील अवैध औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.