अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15 सप्टेंबर) एकुण 204 नागरिकांच्या 40 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक 12 व 7 या संदर्भात दाखल झाल्या असून, इतर अनेक प्रभागांबाबतही नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. अनेकांची एकच हरकत वेगवेगळ्या नावाने दाखल असल्याने त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 5, 6, 9, 10, 11, 13, 14, 15, 16 व 17 या प्रभागांवरदेखील हरकती दाखल झाल्या आहेत. तर, 10 नागरिकांनी सर्व 17 प्रभागांच्या रचनेविरोधातच हरकती नोंदवून असंतोष व्यक्त केला आहे. तर, एक हरकत ईमेलव्दारे वेळ संपल्यानंतर दाखल झाली आहे. नोंदविण्यात आलेल्या हरकतींचे स्वरूप विविध आहे. नैसर्गिक हद्द व भौगोलिक सीमांचे उल्लंघन, चुकीच्या पध्दतीने प्रभागाचे विभाजन, प्रभाग रचना करताना नियमांचे उल्लंघन, आरक्षणातील त्रुटी, वेगळे केलेले भाग पुन्हा जोडावेत, गावठाण क्षेत्र वगळणे, प्रभागात संरक्षण विभागाचा भाग दाखविणे तसेच दाखविलेल्या भागाचा स्पष्ट बोध न होणे अशा मुद्यांवर नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत.
काहींनी तर प्रभाग रचना जुनीच ठेवण्याची मागणी केली आहे. या सर्व हरकतींवर जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. अर्जांची छाननी करून सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ निश्चित करून जाहीर करण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. सुनावणीच्या निष्कर्षांनंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार असून त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकत, सूचनांच्या शेवटच्या दिवशी शहर ठाकरे शिवसेनेने एकत्रित रित्या विविध 14 मुद्द्यांवर हरकती नोंदवल्या. पुनर्रचनेत नागरिकांची गैरसोय झाली आहे.