जनाधार नसलेल्यांच्या आरोपांनी वैतागले पदाधिकारी | गुप्त बैठकीत झाला निर्णय | भाजपा-एकनाथ शिंदे सेना यापैकी एक पर्याय निवडला जाणार
बातमी मागची बातमी | शिवाजी शिर्के:-
कोणताही जनाधार नसलेल्या लुंग्यासुंग्यांनी उठसुठ आमच्यावर आरोप करायचे आणि आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भूमिका आता बस्स झाली! जनाधार काहीच नसताना त्यांनी आम्हाला राजकारण शिकवायचे! एकनिष्ठतेचा धर्म कोण पाळतोय याहीपेक्षा तुम्ही दिवसा एक आणि रात्री एक ही भूमिका घेत आलात, त्याचे काय? कोणत्याही निवडणुकीचा कौल विरोधात गेला किंवा बाजूने आला तरी आम्हाला कायम गद्दार, रंग बदलणारे असे संबोधणाऱ्यांच्या वयाइतके आम्ही राजकारण केले आहे. जनतेच्या सुखदु:खात आम्ही चोवीस तास असतो म्हणून तर आम्हाला जनतेला पाच- पाचवेळा संधी दिली. झाले ते झाले! आता पर्याय निवडावाच लागेल! नगरची जागा लढवायला आम्ही तयार असताना मुंबईतील नेत्यांनी त्याबाबत अवाक्षर काढले नाही. स्वत:च्या पक्षाला जागा मागण्याचे सोडून येथील स्वयंघोषीत युवा कार्यकर्ता शरद पवारांना भेटतो काय आणि स्वत:च्या पक्षाला जागा मागण्याचे सोडून त्यांच्या पक्षातील उमेदवाराचे नाव सुचवतोच कसा? बाजार आम्ही मांडला नाही, तुम्ही मांडला….! हा संपूर्ण संवाद झालाय नगर शहरातील शिवसेनेच्या आजी- माजी पदाधिकारी आणि आजी- माजी नगरसेवकांच्या गुप्त बैठकीत! गुप्त बैठकीत जी चर्चा झाली त्याचा हा तपशिल आम्ही जसाच्या तसा आम्ही ‘नगर सह्याद्री’च्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
शिवसेना आणि नगर शहर हे एक अतुट नाते कायम राहिले. मात्र, अनिल भैय्या राठोड यांच्या अकाली निधनानंतर संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली. तरीही येथील शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक संघटनेसोबतच राहिले. पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत अनिल राठोड हे उमेदवार होते आणि ते संग्राम जगताप यांच्याकडून पराभूत झाले. त्या निकालानंतर लागलीच काही दिवसात विक्रम राठोड यांनी फेसबुक, सोशलमिडीयाद्वारे शिवसेनेत काही गद्दार असल्याचे आणि त्या गद्दारांमुळेच अनिल राठोड पराभूत झाल्याची पोस्ट टाकली! त्याची मोठी चर्चा त्यावेळी झडली. तरीही शिवसेनेच्या स्थानिक नेते- पदाधिकारी आणि नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केेले.
यानंतर लोकसभा निवडणूक झाली! त्या निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात सर्वच शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक राहिले. त्याचे कारण होते, अनिल राठोड यांना दिलेला शब्द विखे पाटलांनी पाळला नाही! लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांना मताधिक्य दिले असताना मागील विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांनी राठोड यांची साथ सोडून संग्राम जगताप यांच्यासाठी भूमिका घेतली आणि तीच भूमिका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली. त्यातून संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देताना निलेश लंके यांचा पर्याय निवडला. राठोड यांना फसवले हेच त्यामागील मुख्य कारण होते. मात्र, तरीही त्या निकालानंतर विक्रम राठोड यांनी सोशल मिडियात व्यक्त होताना पुन्हा शंका उपस्थित केली आणि लंके यांच्याबाबत काहींनी गद्दारी केली असा आरोप केला. लंके यांच्या यशात अनिल भैय्या राठोड यांच्या विचारांचे शिवसैनिक एकसंघ राहिल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. त्यातून विखे यांच्या विरोधात भूमिका घेणारे अनेक शिवसेना नगरसेवक दुखावले!
यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला मिळावी अशी भूमिका नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली. मात्र, महायुतीच्या जागा वाटप बैठकीत ही जागा शिवसेनेसाठी मागण्यासाठी ठाकरे- राऊत यांच्यापैकी कोणीच तोंड उघडले नाही. नगर शहरात शिवसेनेचे मोठे प्राबल्य असतानाही ही जागा पवार गटाला गेली. दोन दिवसांचा अपवाद वगळता सर्व पदाधिकारी- नगरसेवक अभिषेक कळमकर यांच्यासाठी सक्रिय झाले आणि त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. जाहीर भूमिकाही घेतल्या! मात्र, प्रत्यक्षात यश आले नाही.
निकालानंतरच्या दुसऱ्याच दिवशी विक्रम राठोड यांनी गद्दार, रंग बदलवणारे अशी पोस्ट टाकत शिवसेनेतील साऱ्यांना डिवचताना त्या पोस्टच्या शेवटी ‘मित्रासोबत राहीलो’ असा शब्दप्रयोग केला. विक्रम राठोड वगळता शिवसेनेतील सारेच गद्दार आहेत, असाच त्यातून अर्थ निघाला! दरवेळी हेच होणार असेल तर आपण येथील जागा रिकामी करावी आणि त्यांना पाहिजे तशी त्यांनी संघटना वाढवावी अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांनी घेतली. गुप्त ठिकाणी झालेल्या या बैठकीत शब्दश: जी चर्चा झाली ती याठिकाणी मांडली आहे. जवळपास 40 जण या बैठकीत उपस्थित होते.
ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत झाला. राज्यातील सरकार सत्तेवर आल्यानंतर काही दिवसात महापालिका निवडणूका जाहीर होणार आहेत. त्याआधी म्हणजेच पुढच्या दहा- बारा दिवसात हे सर्वजण शिवसेनेला सोडणार आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाची वाढती ताकद विचारात घेता देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाजपात प्रवेश करण्याचा एक मतप्रवाह या बैठकीत आला. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय देखील रचला गेला. राज्याचा मुख्यमंत्री कोण होतो आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे काय जबाबदारी येते हे पाहून पुढच्या काही दिवसात या गटाची दुसरी बैठक होणार आहे. ही बैठक ज्या दिवशी होईल, त्याच दिवशी हे सारे पदाधिकारी मुंबईकडे रवाना होतील आणि ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करतील अशी व्युहरचना अंतिम झाली आहे.
कळमकर-राठोड यांच्या परस्परपुरक भूमिकांनी शंका!
जागा वाटपाच्या चर्चा चालू असताना विक्रम राठोड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीत त्यांनी नगरमधून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्याची मागणी पवारांकडे नोंदवली. त्याच्या दुसऱ्या दिवशी अभिषेक कळमकर यांनी उद्वव ठाकरे यांची भेट घेतली आणि नगरमधून विक्रम राठोड यांना उमेदवारी देण्याची मागणी नोंदवली. अर्थात या दोन्ही भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळली असतानाही आता त्यावर चर्चा झडत आहे. या दोघांनीही एकमेकांच्या नेत्यांकडे उमेदवाऱ्या मागताना एकमेकांचा वापर केला. परस्परपुरक अशी भूमिका घेऊन या दोघांनीही काय साध्य केले याहीपेक्षा विक्रम राठोड यांनी नगरमधील शिवसेना पदाधिकारी- नगरसेवक यांना अंधारात ठेवल्याचे समोर आले.
दिलीप सातपुते- विक्रम राठोड नाराजीच्या केंद्रस्थानी!
नगरची जागा शिवसेनेला न घेण्यात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यात सौदेबाजी झाल्याचा आणि त्यातून नगरच्या शिवसेेनेवर अन्याय झाल्याचा आरोप आता जुना झालाय! मात्र, त्याहीपेक्षा जनाधार असणाऱ्या नगरसेवक, पदाधिकारी यांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची आणि आम्हाला शिव्याशाप देण्याची भूमिका ज्यांनी बजावली त्यांना शिवसेना महत्व देणार असेल तर आम्ही न थांबलेलेच बरे अशी भूमिकाही या बैठकीत घेण्यात आली. दरम्यान, सौदेबाजीवर फोडले खापर फोडणाऱ्यांना आता नगरकरांसमोर उघडे पाडावे लागेल आणि त्यासाठी मुंबईतील कार्यक्रम झाला की यांचा कार्यक्रम राबवावा लागेल अशी भूमिकाही एका ज्येष्ठ नगरसेवकाने मांडल्याचे समोर आले आहे. दिलीप सातपुते यांनी शिवसेना सोडली होती. त्यांना पुन्हा पक्षात घेताना नगरमधील कोणालाही विश्वासात घेतले नसल्याची खंतही या बैठकीत व्यक्त झाली. विक्रम राठोड हे त्याच्या वडिलांच्या नावाचे कायम भांडवल करत आले असताना त्यांचे स्वत:चे गुडवील काय असा सवालही या बैठकीत उपस्थित करण्यात आला.
चितळेरस्त्यावरील शिवालयाकडे सारेच पाठ का फिरवत आहेत?
गेली अनेक वर्षे चितळे रस्त्यावरील शिवालय हे शिवसैनिकांनी गजबजून जायचे! अनिलभैय्या राठोड यांच्या मृत्यूनंतर हे शिवालय म्हणजे स्वत:ची खासगी प्रॉपट असल्यागत विक्रम राठोड हे वापरत आहेत. येथे येणाऱ्यांचा कायम अपमान आणि टिवल्या- बावल्या करत डिवचण्याचे काम झाले. काहीही भूमिका घ्यायची असेल तर शिवालयात येऊन घ्या, अशी मागणी त्यांच्याकडून होते. अनिलभैय्या असताना आम्ही त्यांना देव मानत आलो आणि आजही आमची तीच भूमिका आहे. त्यावेळी अनेक महत्वाचे निर्णय तेथेच झाले. मात्र, त्यांच्या पश्चात आमच्या राजकीय वयापेक्षा कमी वय असणाऱ्या विक्रम याच्याकडून आमचा होणारा एकेरी नामोल्लेख आणि चारचौघात पानउतारा करण्याची पद्धत आम्ही का सहन करायची अशी भूमिकाही याच बैठकीत मांडली गेली. शिवालयाकडे आज कोणी यायला तयार नाही आणि सारेच पाठ का फिरवू लागलेत याचे आत्मपरीक्षण करण्याचे सोडून, त्यात दुरुस्ती करण्याचे सोडून आम्हालाच आरोपी करणाऱ्यांसोबत यापुढे काम करणे अशक्य असल्याची भूमिकाही याच बैठकीत काहींनी मांडली.