Singer Maithili Thakur : भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय लोकगीत गायिका मैथिली ठाकूर यांनी दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. २५ वर्षीय मैथिली यांनी ऑक्टोबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक प्रचारात खूप मेहनत घेतली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विनोद मिश्रा यांच्यावर मात केली.
आजच्या निकालानंतर बिहारच्या जनतेची सेवा करण्यासाठी तयार आहोत. पराभवाचा विचार माझ्या मनात कधीच नव्हता, आणि तसेच घडले विजयी झालो. मागच्या तीस दिवसांत मी मतदारसंघ पिंजून काढला होता. लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यास सज्ज आहे. अशी प्रतिक्रिया विजयानंतर मैथिली ठाकूर यांनी दिली.
अलीनगर मतदारसंघात यावेळी एकूण बारा उमेदवार मैदानात होते आणि ६०.१८% मतदान झाले. संगीतविश्वातून राजकीय विश्वात पदार्पण करणाऱ्या मैथिली ठाकूरने मिथिलांचलच्या तरुण मतदारांची मने जिंकली आणि त्याची प्रचिती निकालातून स्पष्ट दिसून आली. लहानपणापासून वडिलांकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या मैथिली, भोजपूरी आणि हिंदी लोकगीत गायन करतात. त्यांनी आपल्या भावंडासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहेत. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असल्यामुळे त्यांची लोकप्रियता आहे.



