Crime News: पैठण येथून शेवगाव येथे काही अट्टल आरोपी येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली. त्यानूसार त्यांनी गुरूवारी पहाटे शेवगाव शहरात केलेल्या कारवाईत गावठी कट्ट्यासह आठ जणांची टोळी जेरंबद केली आहे. या टोळीकडून दोन वाहनांसह 13 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेवगाव पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत 2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे, 4 मॅग्झीन, दोन स्कॉर्पीओ गाड्या व 11 मोबाईल असा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.
गुरूवारी पहाटे शेवगावचे पोलिस निरिक्षक समाधान नागरे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, पैठण येथून दोन स्कार्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव येथे येणार आहेत. या इसमांकडे गावठी बनावटीचे कट्टे असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेवगाव पोलिसांनी शहरात नाकाबंदी सुरू केली. यावेळी पहाटे पाच वाजता स्कार्पिओ एमएच 16 एबी 5454 व एमएच 17 एझेड 4199 ही ही दोन वाहने पैठण रोडने शेवगावच्या क्रांती चौक या ठिकाणी येत असताना दिसल्या. त्या अडवल्या असता पहिल्या गाडीत पाच व्यक्ती सापडले. तर दुसर्या वाहनात तिन इसम सापडले. यांच्याकडे गावठी कट्ट्यासह अन्य मुद्देमाल सापडला.
पकडलेल्यांमध्ये अंकुश महादेव धोत्रे, शेख आकिब जलील, सुलतान अहमद शेख, दीपक ज्ञानेश्वर गायकवाड, मुक्तार सय्यद सिकंदर, पापाभाई शब्बीर बागवान राहणार शेवगाव व नगर शहर तर पापाभाई बागवान, रा. वेस्टर्न सीटी श्रीरामपुर, सोहेल जावेद कुरेशी, फातेमा हाऊसींग सोसायटी श्रीरामपुर असे नाव व पत्ता सांगितला आहे. यातील एका वाहनात आरोपीकडे गावठी कट्टे, दोन मॅगझीन व 4 जिवंत राऊंड (काडतुस) आणि मोबाईल यासह दोन चारचाकी वाहन मिळून आले. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरिक्षक धरमसिंग सुंदरडे अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक समाधान नागरे, सहायक पोलिस निरिक्षक सुंदरडे, काटे, हवालदार चंद्रकांत कुसारे, आबासाहेब गोरे, किशारे काळे, आदिनाथ वामन, शाम गुंजाळ, भगवान सानप, राहुल खेडकर, संपत खेडकर, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, एकनाथ गर्कळ, धायतडक व होमगार्ड अमोल काळे, शिदें, रवि बोधले तसेच मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुड्डु यांनी केली आहे.