Crime News : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांचा पवन चक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पवन चक्कीच्या कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आवादा ग्रीन पवनचक्कीच्या कंपनीतील शिंदे यांनी फिर्यादी दिली आहे.
२९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात विष्णू चाटे यांनी फोन करत वाल्मीकअण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली. तसेच दुपारी सुदर्शन घुले याने कार्यालयात जात पुन्हा काम बंद करण्याची धमकी दिली. तसेच हातपाय तोडण्याची देखील धमकी दिली.
दरम्यान काही दिवसांनी वाल्मीक कराड यांनी परळी येथील कार्यालयात बोलावून काम सुरू ठेवायचे असेल, तर २ कोटी रुपये द्या असे सांगितले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या त्यांनी मारहाण करण्याच्या धमकी दिल्या आहेत. तसेच यापूर्वी २९ मे २०२४ ला याच कारणावरून शिंदे यांचे अपहरण देखील झाले होते. त्या प्रकरणात त्यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.
याशिवाय ६ डिसेंबरला सुदर्शन घुले व इतरांनी आवादा कंपनीच्या मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्ती प्रवेश करून मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्या प्रकरणात देखील कंपनीच्या शिवाजी थोपटे यांच्या फिर्यादीवरून सुदर्शन घुले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शिंदे नामक व्यक्तीकडून केज पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली असून कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.