Former Prime Minister Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वष गुरूवारी रात्री निधन झाले असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून त्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी म्हणून ओळखले जायचे. मात्र काही प्रसंगी त्यांनी केलेली विधाने अथवा उत्तर कायम चर्चेत राहिली. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना संसदेत त्यांनी शेरोशायरीतून दिलेले उत्तर आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील अनेक राजकारणी, नेत्यांनी, दिग्गजांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज (27 डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मी ॲक्सिडेंटल अर्थमंत्रीही होतो
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 2019 मध्ये चेंजिंग इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी मनमोहनसिंग म्हणाले होते, मला देशात ॲक्सिडेंटल पीएम म्हटले गेले. मला तर वाटते की मी ॲक्सिडेंटल अर्थमंत्रीही होतो. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मनमोहनसिंग यांनी, आपण अर्थमंत्री कसे झालो ते सांगितले होते. मनमोहनसिंग म्हणाले, पी. व्ही. नरसिंहराव यांचे सरकार होते. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. त्यांनी मला फोन केला व विचारले की तुम्ही कुठे आहात? मी त्यांना सांगितले मी माझ्या कार्यालयात बसलो आहे. त्यावेळी त्यांचे उत्तर आले की तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. मला मंत्री व्हायचे आहे हे मला त्यावेळी खरे वाटले नव्हते असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. आता त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येणार आहे. आज ११ वाजता यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील. या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.