सुपा । नगर सहयाद्री:-
घसघशीत परताव्याचे आमिष दाखवत १०५ गुंतवणूकदारांची ४५० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिस्पे फिनोवेल्थ इंडिया, इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट, आणि मूळ कंपनी ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीच्या संचालक मंडळातील आठ जणांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी १०५ गुंतवणूकदारांच्या वतीने विनोद गाडीलकर (रा. वाघुंडे, ता. पारनेर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपींनी विविध हॉटेल्समध्ये कार्यशाळा, सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांना १०–१५ टक्के परताव्याचे खोटे आमिष दाखवले.गाडीलकर यांनी स्वतःच्या गुंतवणुकीनंतर ओळखीच्या लोकांनाही योजनेबाबत माहिती दिली. परिणामी २१ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी सुमारे ४५० कोटी रुपये गुंतवले. सुरुवातीला दिला गेलेला परतावा काही महिन्यांनंतर कमी होत गेला आणि एप्रिल २०२५ पासून संपूर्ण रक्कम परस्पर ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड पोर्टलवर (क्रिप्टो) मध्ये वर्ग करण्यात आली.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांकडून परवानगी न घेता खाती हस्तांतरित करण्यात आली असून, यानंतर कंपनीच्या संचालकांनी संवाद टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक, विश्वासघात, आणि बनावट परताव्याची जाहिरात करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या आदेशानुसार सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखवदे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतर धर, ययाती मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
गुंतवणूकदाराना ५० टक्के नफ्याचे आमिष!
गुंतवणूकदार गाडीलकर यांची समाजातील ओळख पाहून कंपनीचे संचालक राहुल काळोखे आणि सचिन खडतरे यांनी त्यांना खास “ब्रोकरेज प्लॅन” सांगितला. त्याअंतर्गत, गाडीलकर यांनी आणलेल्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या नफ्यातून ५० टक्के रक्कम त्यांनाच देण्याचे आमिष दाखवले. या योजनेचा लाभ घेत अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
मोठ्या स्क्रीनवर पंचतारांकीत हॉटेलमध्ये ‘सेमिनार’!
गाडीलकर यांची ओळख वापरून आरोपींनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकीत हॉटेलांमध्ये सेमिनार आयोजित केले. स्वादिष्ट मिष्टान्न, झगमगाट, मोठ्या स्क्रीनवर बनावट लायसन्स आणि परवानग्यांचे सादरीकरण करत ५०% नफ्याचे तसेच दरमहा १०–१५% परताव्याचे खोटे आश्वासन देण्यात आले. यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली.
१ एप्रिलपासून ‘परताव्याला’ घरघर!
गुंतवणुकीवर ऑक्टोबर २०२४ पर्यंत १०–११ टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने नोव्हेंबरपासून परतावा कमी करत मे २०२५ मध्ये केवळ १.८% केला. ३० मार्च २०२५ नंतर खात्यातील रक्कम काढता येईनाशी झाली. १ एप्रिलपासून गुंतवणूकदारांची परवानगी न घेता खाती ‘ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड’ पोर्टलवर वर्ग करून, रक्कम युएसडीटीमध्ये बदलण्यात आली. शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कंपनीकडून टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे सुरू झाली.