नवी दिल्ली | नगर सह्याद्री:-
कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक ट्रक 50 मीटर खोल दरीत कोसळल्याने 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 20 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक (एसपी) एम. नारायण यांनी सांगितले की, मृत हे फळ व भाजी विक्रेते होते. सावनूर येथून येल्लापुरा जत्रेत फळभाज्या विकण्यासाठी जात होते. सावनूर-हुबळी रस्त्यावरील जंगली भागातून जात असताना हा अपघात झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास येल्लापूर येथे अरेबेल आणि गुलापुरादरम्यान राष्ट्रीय महामार्ग 63 वर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून पोलीसही हादरुन गेले. सर्वत्र फळं पसरलेली होती, रक्ताचा सडा पडलेला होता. जखमी वेदनेने विव्हळत होते तर आठ जणांनी जागीच जीव सोडला होता. एम नारायण म्हणाले, ’सकाळी साडे पाचच्या सुमारास फळभाज्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने दुसऱ्या वाहनाला जाऊ देण्याच्या प्रयत्नात ट्रक डावीकडे वळवला.
मात्र, तो जास्तच वळवण्यात आल्याने ट्रक सुमारे 50 मीटर खोल दरीत कोसळला.’ रस्त्याच्या कडेला दरीला सुरक्षा भिंत नव्हती. या अपघातात आठ जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना हुबळी येथील कर्नाटक वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था (केआयएमएस) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सर्व जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जखमींच्या नुकसान भरपाईसाठीही सरकारी मदत मागितली जाणार आहे.