मुंबई | नगर सहयाद्री-
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नियोजित कटाचा भाग होती आणि त्यामागे वाल्मिक कराडचं मास्टरमाइंड म्हणून प्रमुख योगदान होतं, असा ठपका विशेष मकोका न्यायालयाने आपल्या निर्णयात ठेवला आहे. कराड याने दोषमुक्ती मिळावी म्हणून बीड जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, गंभीर पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.
विशेष न्यायालयाने नमूद केलं आहे की, वाल्मिक कराड हा एक सक्रिय गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये सात गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे, तर ११ फौजदारी प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. एकूण गुन्ह्यांची संख्या २० पेक्षा अधिक, ज्यात खंडणी, धमकी, मारहाण, जबरदस्ती यांचा समावेश आहे.
संतोष देशमुख यांचा खून एका सुनियोजित कटाअंतर्गतच झाला, कारण ते गुन्हेगारी टोळीच्या खंडणी मार्गात अडथळा ठरत होते. त्यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात वाल्मिक कराडची भूमिका मध्यवर्ती होती, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. कराडविरोधात डिजिटल पुरावे, गोपनीय जबाब, फॉरेन्सिक अहवाल आणि थेट साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने ग्राह्य धरले. या आधारे त्याच्याविरुद्ध सबळ व ठोस पुरावे उपलब्ध असल्याने दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आला.