पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक
अहिल्यानगर। नगर सहयाद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी (दि.९) पहाटे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निघृण खून केल्याची घटना घडली. राणी सतीश खेडकर (वय २९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून, तिचा पती सतीश भास्कर खेडकर (वय ३३) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी पती सतीश खेडकर याने घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार करत तिचा जीव घेतला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी घडली. खून केल्यानंतर आरोपी सतीश खेडकर स्वतःहून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर हत्या केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खेडकर याला पाच वर्षाचा एक व सात वर्षाचा एक अशी दोन मुले आहेत. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलीचे वडील सुखदेव आप्पाजी ढाकणे (रा. हसनापूर ता. ता. शेवगाव) शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात सतीश खेडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.