Maharashtra Crime News: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण हिंगोली हादरून गेलं असून परिसरात चकित करणारे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवाजी पोटे (रा. कुरुंदा, ता. औंढा, जि. हिंगोली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते कुटुंबासह भेंडेगाव परिसरात सालगडी म्हणून शेतात काम करत होते. त्यांची पत्नी मंगल पोटे व दोन मुलंही त्यांच्यासोबत राहत व काम करत होती.मुलांना शाळेत सोडण्यासाठी रोज जाणाऱ्या मंगलचे शिरड शहापूर येथील शाळेतील स्वयंपाकी ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासोबत संबंध वाढले. रोजच्या भेटींनी मैत्रीचं रूप प्रेमात बदललं. हे नातं पती शिवाजी पोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.
पतीचा विरोध कायमचा संपवण्यासाठी मंगला आणि ज्ञानेश्वरने कट रचला. त्यांनी शिवाजी पोटे यांना शेतशिवारात बोलावून घेतलं आणि त्यांच्या डोक्यात लाकडाने वार केला. या हल्ल्यात शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून दिला.नंतर पत्नीने मुलांना सांगितले की, वडील हरवले आहेत. परंतु कुरुंदा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरू करून सत्य उघडकीस आणले.
सखोल तपासात मंगलने खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी तिला व तिच्या प्रियकराला तात्काळ अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे
या घटनेने संपूर्ण भागात खळबळ उडाली असून, विवाहबाह्य संबंधाचे गंभीर परिणाम समाजापुढे अधोरेखित झाले आहेत. या प्रकारामुळे पती-पत्नीच्या नात्यावरील विश्वासाचा गाभा हादरला असल्याचे नागरिक म्हणत आहेत.