अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील वाढत्या जड वाहन वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, शहरातील बाजारपेठ भागात हलकी व जड मालवाहतूक वाहने आता फक्त रात्री 10.00 ते सकाळी 6.00 या वेळेतच प्रवेश करू शकतील. यापूर्वी दुपारी 1.00 ते 3.00 या वेळेत बाजारपेठेत जड वाहनांना परवानगी होती, ती आता रद्द करण्यात आली आहे.
सकाळी 6.00 ते रात्री 10.00 या कालावधीत, सर्व प्रकारच्या मालवाहतूक वाहनांना बाजारपेठेत प्रवेश बंद असेल. फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वाहने व निवडणूक कर्तव्यावरील वाहने यांना यामधून सवलत देण्यात आली आहे. या नव्या आदेशानुसार, वरील बंदीच्या वेळेत कोणतेही मालवाहू वाहन शहरात किंवा रस्त्यालगत उभे ठेवणेही प्रतिबंधित असेल. या निर्णयामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार असून अपघातांचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगर/मनमाडकडून पुणे/कल्याणकडे जाणारी वाहने शेंडी- निंबळक- केडगाव मार्गे वळवली जातील. पुण्याहून मनमाड /छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने: केडगा -निंबळक-शेंडी मार्गे मार्गक्रमण करतील. अशी अधिसूचना लवकरच शासकीय राजपत्रात प्रसिद्ध होणा असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे. वाहनचालकांनी व वाहतूक कंपन्यांनी नव्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.