श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोडवरील‘एस संकल्प मॉलला सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. नवरात्री व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्टॉक केलेला संपूर्ण माल जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मेजर नवनाथ खामकर यांच्या मालकीच्या या मॉलमध्ये पहाटेच्यावेळी अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. काही क्षणातच आगीचे लोळ आकाशात भडकले आणि संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. शर्थीच्या प्रयत्नांने श्रीगोंदा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदत केली. मात्र, तोपर्यंत मॉलमधील संपूर्ण माल जळून खाक झाला होता. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आग प्रतिबंधक उपाय अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ही घटना नवरात्र व दिवाळीच्या तोंडावर घडल्याने इतर व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याबाबत तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.