अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
बुऱ्हाणनगर परिसरात सोमवारी दोन स्वतंत्र मारहाणीच्या घटना घडल्या. जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पहिल्या घटनेत, अभिषेक गोरख धाडगे (वय 20, रा. धाडगेमळा, कापुरवाडी) याने फिर्याद दिली. दुपारी बुऱ्हाणनगरमधील अनिल टेलरच्या दुकानाजवळील चौकातून मोटारसायकलवर जात असताना ओंकार कैलास शेलार आणि सिद्धार्थ चंद्रकांत महेत्रे (दोघे रा. बुहाणनगर, देवी मंदिराजवळ) यांनी थांबवले. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी अभिषेक याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून नादी लागशील तर जीवे मारू अशी धमकी दिली.
तर दुसऱ्या घटनेत, सलमान रफिक शेख (वय 25, रा. कापुरवाडी) याने फिर्याद दिली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बुऱ्हाणनगर रोडवरील गुगळे फार्म हाऊसजवळ मोटारसायकलवर जात असताना गालीब खान आणि रेहान खान (दोघे रा. बुहाणनगर, देवी मंदिराजवळ) यांनी त्याला थांबवले. तू माझ्याकडे नेहमी खुन्नसने का पाहतो? असे म्हणत त्यांनी सलमान याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास भिंगार पोलीस करीत आहेत.
विनापरवाना घोडागाडी शर्यत भोवली चार आयोजकांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात वाळुंज बायपास ते सारोळा बद्धी बायपास दरम्यान कुठलीही परवानगी न घेता घोडागाडी (टांगे) शर्यत भरविल्या प्रकरणी चौघा आयोजकांवर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण युवराज बेरड, अजय विलास जाधव, मनोज बारस्कर, शिवा राऊत (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे आयोजकांची नावे आहेत. यांनी रविवार (ता. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नगर तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात वाळुंज बायपास ते सारोळा बद्धी बायपास दरम्यात ही घोडा गाडी शर्यत भरविली होती. यात 20 ते 25 घोडा गाड्या, 100 ते 150 पशुपालक तसेच ही शर्यत पाहण्यासाठी अनेकांनी गद केली होती. या गदत शर्यत पुकारून रस्त्यावरून घोडा गाड्या पळविल्या, त्यावेळी या गाड्यांमध्ये बसलेले गाडा चालक हे घोड्यांना चाबकाने मारून त्यांना क्रूरतेची वागणूक देत होते. तसेच या शर्यतीमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांची अडचण झाली.ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक तेथे गेले. त्यांनी आयोजकांना शर्यतीच्या परवानगी बाबत विचारणा केली असता, त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयोजकांवर गुन्हा दाखला करण्यात आला आहे.