राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची निवड; जलतरण व पॉवरलिफ्टिंगमध्ये यश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
स्पेशल ऑलिंपिक भारतच्या महाराष्ट्र शाखेतर्फे पुणे येथील बालकल्याण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण व पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत अहिल्यानगर शाखेतील पाच दिव्यांग खेळाडूंनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. त्यातील बाबू व दीपक पावरा या दोन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरासाठी आपली निवड निश्चित केली आहे, ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची ठरली आहे.
जलतरण स्पर्धेत, बाबू याने 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये प्रथम क्रमांक, तर 100 मीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. दीपक पावरा याने 50 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. पॉवर लिफ्टिंगमध्ये, चि. रज्जाक गोच्चू याने स्कॉट 40 किलोग्रॅम वजन गटात बेंच प्रेस- 40 किलोग्रॅम, डेड लिफ्ट-95 किलोग्रॅम वजन उचलून उत्कृष्ट कामगिरी केली. चि. कृष्णा यांने- स्कॉट- 40 किलोग्रॅम, बेंच प्रेस- 35 किलोग्रॅम, डेड लिफ्ट- 80 किलोग्रॅम. चि.अभिजित माने याने स्कॉट- 20 किलोग्रॅम, बेंच प्रेस -किलोग्रॅम, डेड लिफ्ट -35 किलोग्रॅम वजन उचलून यशस्वी सहभाग नोंदवला. या सर्व खेळाडूंना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या स्पोर्ट्स अकॅडमीत प्रशिक्षण मिळाले असून, डॉ. किरण आहेर, विक्रांत येवले, प्रा. संदीप राहाणे, दत्तात्रय कोलते व हर्षल वाणी या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
हे सर्व खेळाडू जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळेंमध्ये शिक्षण घेत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना जागतिक व देश पातळीवर आपले नावलौकिक मिळावे म्हणून रणरागीणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल ऑलिंपिक भारताच्या अहिल्यानगर शाखेची सुरुवात करण्यात आली आहे.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन तर्फे या सर्व दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत असून, विखे पाटील भौतिक उपचार महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून खेळाडूंच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी विविध व्यायामांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या यशाबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रा. डॉ. अभिजीत दिवटे, प्रशांत गायकवाड, डॉ. दीपक अनाप, डॉ. अभिजीत मेरेकर, सचिन तरोटे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.