लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांना ओव्हर कॉन्फिडन्स नडला असल्याचे सांगत आमदार काशीनाथ दाते यांची ४० वर्षांची कारकीर्द पहावी मगच दाते सर समजतील असा टोला आ. काशीनाथ दाते यांच्या सूनबाई अर्चना दाते यांनी राणी लंके यांना लगावला.
महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार राणी लंके यांनी निकालानंतर आमदार काशिनाथ दाते यांच्यावर टीका करत आमदारांना तालुकयात कोणीही ओळखत नसल्याची टीका केली होती. त्यावर आमदार काशीनाथ दाते यांच्या सून सौ. अर्चना दाते म्हणाल्या की, मतदारसंघांमध्ये दाते सरांना कोणी ओळखतच नाही असे चुकीचे विधान त्यांनी वापरले. तालुयामध्ये गेली ४० वर्षांची दाते सर यांची राजकीय कारकीर्द आहे. सर्वसामान्य जनतेला त्याची जाणीव आहे. प्रचारासाठी आठच दिवस जरी मिळाले. मतदारसंघामध्ये १७४ गावांमध्ये आमचे सर्व नातेवाईक, कार्यकर्ते, महिलावर्ग यांनी समर्पित होऊन प्रचारात उडी घेतली. संपूर्ण तालुका पिंजून काढला. त्यावेळेस समोरचा उमेदवार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहून फक्त बढाया मारण्यातच मग्न होता. मतदानाच्या दोन दिवस अगोदर समोरच्या उमेदवाराला या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
राणी लंके यांना माहेरच्या गावामध्ये, नात्यांच्या गावांमध्ये हवे तेवढे लीड मिळाले नाही. आम्ही सर्व महिलांनी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन मतदाराची भेट घेतली, सरांच्या विकास कामाची माहिती दिली. त्यामुळे विजयाचे पारडे दाते सर यांच्या बाजूने झुकले. खरंतर हा विजय म्हणजे आमदार काशीनाथ दाते यांनी ४० वर्ष जनतेला दिलेली सेवा आणि त्यामुळे जनतेने मनापासून दिलेला आशीर्वाद आणि सदिच्छा यांचाच आहे असे मत आमदार दाते यांच्या सून सौ.अर्चना दाते यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. व राणी लंके यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांचा धक्कादायक पराभव केल्यानंतर तालुयात एकमेकांच्या विरोधात आता टीकाटिप्पणीला सुरुवात झाली आहे. ईव्हीएम मशीनवर शंका घेत राणी लंके यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्यावर गेल्या चार दिवसापूर्वी टीका केली होती. या टीकेला सौ.अर्चना दाते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.