Maharashtra Politics News: सोलापूरच्या बार्शी तालुक्यात शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांच्या गाडीच्या जाळपोळ प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊत याचा सहभाग असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला.
त्यावर राऊत यांनी आक्रमक प्रत्युत्तर देत रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, “रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने शहाणे झाल्यासारखे बोलतात. आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते, पण तुमच्या आजोबांची संपत्ती कुठून आली? तुम्ही कोणाची घरं मोडलीत, याची माहिती आमच्याकडे आहे.
रोहित पवार यांनीही राऊतांना प्रत्युत्तर देताना, “जहागिरी गेली, पण फुगिरी गेली नाही,” असा टोला लगावला. त्यांनी गाडी जाळपोळीच्या घटनेसाठी गृहखात्याला जबाबदार धरत, “जाधवर कुटुंबाला उद्या काही झालं, तर याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची असेल,” असा इशारा दिला. राऊत यांनी रणवीरवरचे आरोप फेटाळताना सांगितले की, जाधवर यांनी पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली आहे.
तसेच, रणवीरने एका मुलीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर रागात शिवीगाळ केली, जी अशोभनीय होती, परंतु त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. या प्रकरणाने सोलापूरच्या राजकारणात खळबळ माजवली असून, दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. आता रोहित पवार राऊतांच्या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.