मुंबई | नगर सहयाद्री
राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. आजपासून कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून, या भागांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी पडण्याचा इशारा देत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल (गुरुवार) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभरात बहुतांश ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील बहुतांश भागांत आकाश साफ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र मोठा पावसाचा अंदाज नाही. नागरिकांनी काय काळजी घ्यावी? मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे घाटमाथ्यावर प्रवास करताना काळजी घ्यावी. विजांच्या कडकडाटाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गरज असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि अपडेट्स लक्षपूर्वक पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.