मुंबई । नगर सहयाद्री
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता थेट विधानमंडळ चौकशी अहवालाचा दाखला देत, मंत्री कोकाटे केवळ ४२ सेकंद नव्हे, तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत होते, असा गंभीर आरोप केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
याआधी रोहित पवार यांनी कोकाटे यांचा कार्ड खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत, “शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्री पत्ते खेळत आहेत” असा आरोप केला होता. त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. आता चौकशी अहवाल पुढे करत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती देत सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.