मुंबई | नगर सहयाद्री
राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. विशेषतः कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागात तुफान पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आजपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून नदी-नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरील भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल.विदर्भातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, हवामान खात्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, शेतातील पिकांचे योग्य व्यवस्थापन करावे व नदीकिनारी अथवा दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.