सुपा । नगर सहयाद्री:-
राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार पारनेर तालुक्यातील 54 गावांचा डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यात आला आहे. उपसचिव नि. भा. खेडकर यांनी दिनांक 13 मार्च रोजी शासन निर्णय क्रमांक डोविका-2021, प्र.क्र. 58/का.1481-अ अन्वये ही यादी जाहीर केली आहे.
संबंधित गावांतील विद्यार्थ्यांना डोंगरी दाखल्याच्या माध्यमातून शैक्षणिक सवलती व नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्राधान्य, शिष्यवृत्ती, तसेच सरकारी सेवांमध्ये आरक्षण या सुविधांचा या निर्णयामुळे फफायदा होणार आहे. यामुळे या भागात सामाजिक व शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
भोयरे गांगर्डा, कडूस गावांवर अन्याय!
चहूबाजूंनी डोंगर वेढा असलेल्या भोयरे गांगर्डा व कडूस गावांचा शासन निर्णयात समावेश न केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे गवे जिरायती पट्ट्यात असल्याने शासकीय अनेक योजनांपासून वंचित आहेत, तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या भोयरे गांगर्डा व कडूस या दोन गावांचा डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत समावेश न झाल्याने खरी गरज असून सुद्धा येथील विद्याथ डोंगरी दाखल्यांसह शिक्षण व नोकरीच्या सवलतींना मुकणार आहेत. येथील विकास देखील खुंटणार आहे.
यादीत ’या’ 54 गावांचा समावेश!
भोंद्रे, ढोकी, सांगवी सूर्या, पिंपरी गवळी, वाळवणे बुद्रुक, पिंपरी पठार, धोत्रे बुद्रुक, पठारवाडी, जातेगाव, टाकळी ढोकेश्वर, गटेवाडी, पानोली, नारायण गव्हाण, विरोली, गोरेगाव, वडगाव दर्या, पाडळी दर्या, काकणेवाडी, खडकवाडी, सारोळा आडवाई, रायतळे, पळसपुर, पिंपरी जलसेन, नांदुर पठार, पुणेवाडी, वनकुटे, वडगाव गुंड, म्हसोबा झाप, अक्कलवाडी, राळेगण सिद्धी, मांडवे खुर्द, हत्तलखिंडी, तिखोल, बाभूळवाडे, कळस सावरगाव, डोंगरवाडी, चिंचोली, वारणवाडी, तास, पोखरी, कारेगाव, सिद्धेश्वरवाडी, जाधववाडी, शहांजापूर, गारखिंडी, देसवडे, दरोडी, शेरी कोलदरा यासह 54 गावांचा समावेश आहे.