पळशीतील आदिवासी कुटुंबाच्या घराला आग; संसार उपयोगी साहित्य जळाले
ऐन दिवाळीच्या काळात आदिवासी कुटुंबावर संकट
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पळशी येथे दिवाळी मध्येच सणासुदीच्या काळात आदिवासी कुटुंबावर संकट कोसळले असून राहत्या घराला अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही दुर्दैवी घटना शनिवार दि. २ नोव्हेंबर दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडली.
पळशी येथील शिंदे वस्ती परिसरामध्ये राहणाऱ्या संगीता जनार्धन मधे व शांताबाई चिमा मधे या महिलांच्या आदिवासी कुटुंबावर जळीतकांडा मुळे मोठे संकट कोसळले.
पळशी या ठिकाणी आपल्या पोटाची गुजराण करत असताना त्यांनी आपाला संसार थाटलेला होता आणि ते आपापल्या कामानिमित्त शेतामध्ये कामाला गेलेले होते आणि अनेक वर्षापासून पळशी या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. ते आपली पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जातात आणि आपला चरितार्थ चालवतात. ऐन दिवाळीच्या काळामध्ये ह्या कुटुंबावर खूप मोठे संकट कोसळले आहे आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. या कुटुंबाच्या संसार उपयोगी वस्तू त्यामध्ये भांडी, अन्नधान्य,गॅस शेगडी, खाट,शालेय साहित्य आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल या आगीमध्ये जळून खाक झालेले आहे. या ठिकाणी या दुर्घटनेची माहिती मिळताच पळशीचे सरपंच प्रकाश राठोड, संपत जाधव, गणेश शिंदे, नवनाथ आगविले, व ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनेची माहिती समजताच सरपंच प्रकाश राठोड यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना या दुर्घटनेची माहिती दिली. आणि लगेच तात्काळ पंचनामा करण्यात आला. ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की, या आदिवासी कुटुंबाला आपल्या माध्यमातून आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य जे जे आपल्याकडून शक्य होईल ती मदत आपण या कुटुंबाला करावी ही नम्र विनंती. असे सरपंच राठोड यांनी सांगितले.