अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील नीलक्रांती चौक आणि दिल्लीगेट परिसरात बेकायदा सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या दोन कारखान्यांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापे टाकले. या कारवाईत 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांना ताब्यात घेण्यात आले, तर एकजण पसार झाला. तोफखाना पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पथकाला मिळालेल्या माहितीवरून उपअधीक्षक संतोष खाडे यांनी तोफखाना पोलिस आणि अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह नीलक्रांती चौकातील अभिनव पान स्टॉलवर छापा टाकला. याठिकाणी गौरव राजू आल्हाट (वय 34, रा. नीलक्रांती चौक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 किलो सुगंधी तंबाखू, 80 हजारांचे मावा तयार करण्याचे मशीन आणि 15 हजारांचे सुपारी कटिंग मशीन असा 96,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप परशुराम पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या कारवाईत दिल्लीगेट येथील माणकर गल्लीतील जिव्हेश्वर पान स्टॉलवर छापा टाकून संजय मुरलीधर व्यवहारे (वय 52, रा. भूषणनगर, केडगाव), मयूर शंकर उबाळे (वय 37, रा. शिवाजीनगर) आणि गोविंद राधाकिसन मंगलारप (वय 48, रा. दिल्लीगेट) यांना ताब्यात घेतले. संजय आणि पसार झालेला अमोल मदन सदाफुले यांचा हा व्यवसाय असल्याचे उघड झाले. येथून 10 किलो मावा, 2.20 लाखांचे दोन मशीन, मावा साहित्य आणि 5 हजारांचे दोन वजनकाटे असा 2.33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.