अहिल्यानगर / नगर सह्याद्री
अहिल्यानगर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत चालला असून कामरगाव येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी खारे कर्जुने येथे आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्यादेखत बिबट्याने पाच वर्षीय चिमुरडीला उचलून नेले.
रियांका सुनील पवार असे त्या मुलीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्याचे काम ग्रामस्थांच्या मदतीने वन विभाग व एमआयडीसी पोलिसांकडून सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खारे कर्जुने परिसरात शेतावर काही मजूर कुटुंबे वस्ती करून राहतात. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुनील पवार यांचे कुटुंब शेतात काम संपवून वस्तीवर शेकोटीजवळ बसले होते. पाच वर्षीय रियांका शेकोटीपासून थोड्याच अंतरावर खेळत होती. अचानक शेजारच्या तुरीच्या शेतातून बिबट्या बाहेर आला आणि क्षणात रियांकाला उचलून पळून गेला. ही घटना काही क्षणांत घडली.
घरच्यांनी आणि इतर मजुरांनी आरडाओरड करत पाठलाग केला, पण बिबट्या रात्रीच्या अंधारात गायब झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने वस्तीवर धाव घेतली. लोकांनी स्वतःच्या पातळीवर शोधमोहीम सुरू केली.
माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला जात होता. मात्र रात्री उशिरापर्यंत मुलीचा मागमूस लागलेला नव्हता.
अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतशिवारात आणि वस्त्यांवर बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.



