अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विमान तिकीट बुकिंग एजन्सीच्या नावाखाली दिल्या जाणार्या कमिशनचे आमिष दाखवून एका तरूणीला 30 लाख रूपयांना गंडवण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंचल पवनकुमार अग्रवाल (वय 24, रा. तांबटकर मळा, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये आपल्या कुटुंबासाठी विमान तिकीट बुक करताना अनुज मित्तल यांच्याकडून ‘रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायजेशन’ या नवी मुंबईस्थित कंपनीबाबत माहिती मिळाली.
सदर कंपनी हॉटेल व फ्लाईट बुकिंग व्यवसायासाठी एजंट शोधत असल्याचे सांगण्यात आले. अनुज मित्तल यांनी फिर्यादीची भेट 27 ऑगस्ट 2024 रोजी अहिल्यानगर येथे राहुल दर्शन जगताप व त्याची पत्नी एंजेल राहुल जगताप (दोघेही रा. सानपाडा, नवी मुंबई) यांच्याशी घडवून दिली. त्यांनी व्यवसायात 15 टक्के कमिशनच्या अटीवर एजन्सी देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी 30 लाख रूपये प्रारंभिक ठेव म्हणून मागितली. फिर्यादी यांनी 10 सप्टेंबर 2024 रोजी येस बँकेमधून दोन व्यवहारांव्दारे एकूण 30 लाख रूपये सुशिला जगताप यांच्या बँक खात्यात वर्ग केले.
त्यानंतर, राहुल व एंजेल यांनी विविध कारणे देत एग्रीमेंट पुढे ढकलले. काही दिवसांनी त्यांनी फिर्यादीचे कॉल घेणे थांबवले. एजन्सी देण्याचे आमिष दाखवून, 15 टक्के कमिशन मिळेल या नावाखाली एकूण 30 लाख रूपये उकळले गेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी राहुल दर्शन जगताप, एंजेल राहुल जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज पोर्टलसाठी हेर्डिंग तयार करून पाहिजे?