अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 79 लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला असून, संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमाणित लेखापरीक्षक सोमनाथ बाबुराव सोनवणे (वय 61 रा. भिस्तबाग नाका, छत्रपती कॉलनी, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. चेअरमन उमेश रमाकांत निंबाळकर, व्हा. चेअरमन संजय पांडुरंग भनगडे, संचालक नितीन सुधाकर गायकवाड, संजय भास्कर कुसळकर, राजाराम मारूती पाटील, गोविंद ज्ञानदेव गाडेकर, संजय लिंबाजी घुगरे (सर्व रा. नवनागापूर), सोपान चांगदेव जाधव (रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर), संचालिका मनिषा दिलीप म्हस्के, शोभा विलास ढेकणे, स्मिता विलास अडसुरे (सर्व रा. नवनागापूर), व्यवस्थापक विलास नानासाहेब अडसुरे (मयत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पतसंस्थेच्या लेखापरीक्षणात मोठ्या प्रमाणावर वित्तीय गैरव्यवहार आढळला. संस्थेचे ठेवीदार दशरथ सखाराम पुंड (रा. नांदगाव, शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर) यांनी त्यांच्या वतीने संदीप गाडेकर (रा. नांदगाव, ता. अहिल्यानगर) यांच्या नावे ठेवलेल्या मुदत ठेवीसंबंधी चौकशी केली असता, त्यांची ठेव केलेली रक्कम संस्थेच्या ताळेबंदात आढळली नाही. तपासणी दरम्यान लेखापरीक्षकांना मुदत ठेव पावत्यांच्या रकमांची नोंद संस्थेच्या लेखा नोंदींमध्ये नसल्याचे निदर्शनास आले.
संस्थेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे संगणीकृत असल्याने, संस्थेचे माजी क्लार्क सुनिता घोडेचोर यांच्या मदतीने उपलब्ध केलेल्या संगणक नोंदींची तपासणी करण्यात आली. या चौकशीत संचालकांनी संगणमत करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. संस्थेच्या चेअरमन निंबाळकर, व्हा. चेअरमन भनगडे यांच्यासह 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करीत आहेत.