अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अलीकडच्या काही दिवसांत लुटमारीच्या घटना घडलेल्या चास (ता. अहिल्यानगर) शिवारात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्पर कारवाई करून दरोड्याच्या तयारीत असलेली सात जणांची टोळी पकडली आहे. पोलिसांनी संशयितांकडून 3 लाख 88 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये टेम्पो, मोबाईल फोन तसेच दरोड्यात वापरता येणारी धारदार शस्त्रे व लोखंडी साधनांचा समावेश आहे.
बुधवारी (20 ऑगस्ट) पहाटे 12.15 वाजता चास गाव शिवारातील बंद पडलेल्या हॉटेल श्रेया जवळ अहिल्यानगर- पुणे रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. सातही संशयित आरोपी हत्यारे व वाहनासह दरोड्याची तयारी करताना पोलिसांच्या हाती लागले. यामध्ये सनी शामराव पवार (वय 23, रा. बुरूडगाव, ता. अहिल्यानगर), जय दिलीप बागुल (वय 19), अक्षय राजु देठे (वय 25, दोघे रा. शेंडी, ता. अहिल्यानगर), गणेश भिमराव पवार (वय 19), पवन भाऊसाहेब ढमढेरे (वय 21), राहुल संतोष गायकवाड (वय 22), आकाश अनिल धोत्रे (वय 19, सर्व रा. बुरूडगाव, ता. अहिल्यानगर) या संशयितांचा समावेश आहे. पकडलेल्या सात जणांच्या ताब्यातून टेम्पो (एमएच 17 बीवाय 7656), धारदार चाकू, लोखंडी पहार, हातोडी, छन्नी, नट-बोल्ट काढण्यासाठी पान्हे आदी साहित्य, 8 मोबाईल फोन असा एकुण 3 लाख 88 हजार 50 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. बी. धुमाळ व ई. बी. आव्हाड, अंमलदार बाबासाहेब खेडकर, नितीन शिंदे, विक्रांत भालसिंग, विठ्ठल गोरे व साठे यांनी ही कारवाई पार पाडली. पुढील तपास उपनिरीक्षक आव्हाड करत आहेत.