Accident News:नगर-मनमाड महामार्गावर लोहगाव शिवारामध्ये हॉटेल अजित जवळ लक्झरी बस व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर जवळच असलेल्या बबन चेचरे यांच्या बंगल्याचे गेट तोडून बंगल्यासमोर उभा असलेला ट्रॅक्टर उडवून बंगल्याची भिंत फोडून बंगल्यात घुसला. सुदैवाने यात जिवीतहानी टळली मात्र चेचरे यांच्या बंगल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नगरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक एमएच १८ बीजी ९३०० व मनमाडकडून नगरकडे जाणारा कंटेनर क्रमांक जीजे ०६ बीटी ८३३४ हॉटेल अजित जवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत कंटेनर जवळच असलेल्या बबन हौशीराम चेचरे यांच्या घरात रात्री १.४० वाजता घुसला. कंटेनरचा वेग इतका जोरात होता की त्याने घरासमोरील तारकंपाउंड, नारळाचे एक झाड मुळासकट उन्मळून पाडले.
घराशेजारी लावलेला ट्रॅक्टर या कंटेनरने दाबला. कंटेनर घराच्या भिंतीला आदळल्याने भिंत तुटली. या घरात चेचरे कुटुंबातील काही सदस्य झोपलेले होते. घरातील व्यक्तींना इजा झाली. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या घरातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.