मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यातील अगग्रण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षपदी श्रीमती गीतांजली उदयराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी भास्करराव बाबाजी कवाद यांची निवड झाली. जी एस महानगर बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सत्ता एकहाती खेचून आणण्यात गीतांजली उदयराव शेळके यांना यश आले. त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मत्तांच्या फरकाने विजयी झाले होते.
विरोधी सुमनताई शेळके यांच्या मंडळाचा सभासदांनी धुव्वा उडवला. संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदानासाठी 69 हजार 421 मतदार पात्र होते. त्यापैकी रविवारी झालेल्या मतदानात 17 हजार 681 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार झालेले मतदान हे अवघे 25.47 झाले होते. सोमवारी जी एस महानगर बँकेच्या नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी गीतांजली शेळके तर उपाध्यक्षपदी भास्करराव कवाद यांची निवड झाली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.