अहिल्यानगर । नगर सहयाद्री
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरक्षेचा फज्जा उडवणारी घटना घडली आहे. ५ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत रुग्णालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी जनरेटरची बॅटरी, सोलार पॅनल आणि खिडकीचे ग्रील लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी प्रविण अशोक बोठे (वय ४२, रा. वाळकी, ता. व जि. अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.सदर वस्तू अपघात विभाग व परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीवरून चोरीला गेल्या आहेत.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब प्रशासकीय अधिकारी श्री. बोठे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शहरातील हे प्रमुख जिल्हा रुग्णालय आहे. दिवसभर हजारो नागरिकांची येथे वर्दळ असते. अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणा असतानाही चोरी घडल्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.