जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी ऍड. विश्वासराव आठरे
अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था अशी ओळख राहिलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी ऍड. विश्वासराव आठरे यांची आज निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी रा. ह. दरे यांची याआधीच निवड करण्यात आली होती. आजच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत दरे यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणार्या या शिक्षण संस्थेची जिल्ह्यात अनेक विद्यालये, महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण देणार्या शाखा आहेत. संस्थेचे यापूर्वीचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष श्री. रा. ह. दरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. कार्यकारी मंडळाचा कालावधी संपल्याने आज झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत रा. ह. दरे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
दरम्यान, संस्थेत याआधी सहसचिव म्हणून काम पाहत असलेल्या ऍड. विश्वासराव आठरे यांची आता सचिवपदी निवड करण्यात आली. संस्थेचे विद्यमान सचिव श्री. खानदेशे यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी ऍड. विवेक भापकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय संस्थेच्या सहसचिव पदावर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांची तर खजिनदार पदावर ऍड. दिपलक्ष्मी म्हसे यांची निवड करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन होत असून संस्थेला शिस्त लावण्याचे मोठे आवाहन नव्या पदाधिकार्यांसमोर असणार आहे.