जालना । नगर सहयाद्री:-
संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. मात्र परळीमधील एका प्रचारसभेदरम्यान, माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची आठवण काढली. आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव होते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. धनंजय मुंडे यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो. जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही. शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजित पवार यांचे डोळे अजूनही उघडले तर बरे होईल. गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं?” असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
“धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत. नाहीतर धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्ही देखील खाक व्हाल. असा गुंड आणि टोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक आहे. त्याला सरकारने तात्काळ जेरबंद करायला पाहिजे,” असे आव्हान मनोज जरांगे यांनी मुंडे यांना दिले आहे.
परळीमध्ये प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली. “जगमित्र हे कार्यालय 24 तास सर्वांसाठी खुलं असायचं. आताही कार्यालय सुरू आहे. पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीव आहे,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
परळीच्या जगमित्र कार्यालयात बसूनच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचं काम पहायचा. धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभांची सगळी तयारी सुद्धा वाल्मिक कराडच करायचा. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो सध्या बीडच्या कारागृहामध्ये आहे.



