अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कर्जाच्या वादातून तिघा जणांनी एका युवकावर काठी व दगडाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (9 मे) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुमाळ माथा, वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) शिवार येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशीष राजाराम भोसले (वय 19, रा. दोस्ती हॉटेल जवळ, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजी सोपान गिते, सोपान जगन्नाथ गिते (दोघेही रा. वडगाव गुप्ता) आणि योगेश मोहन कापसे (रा. बाराबाभळी, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून आशीष याच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण करून शिवीगाळ केली व मारहाण केली.
फिर्यादी हे शिवाजी गिते याला, तुम्ही कारचे वर्षभर कर्ज फेडले नाही म्हणून आम्हाला नोटीसा आल्या आहेत, तुम्ही कर्ज फेडा नाहीतर आम्हाला दिलेले 50 हजार रूपये आम्ही तुम्हाला पुन्हा देतो व आमची कार आम्हाला परत द्याफ असे म्हणाले. याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केला. फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार साबीर शेख अधिक तपास करीत आहेत.