अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:-
भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील कोल्हेवाडी गावात एका तरुणाने फक्त मध्यस्थी केल्याच्या रागातून महिलेच्या घरासमोर उभी असलेली कार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवार (ता. १६ ऑक्टोबर) रोजी घडली.
याप्रकरणी संगिता हरीभाऊ कुटे (वय ५२, रा. कोल्हेवाडी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल धर्मा कुटे (रा. कोल्हेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुटे व ज्योती शरद कुटे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता.
त्यावेळी संगिता कुटे यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले होते. मात्र, याचा राग राहुलने मनात धरला. गुरुवारी पहाटे सुमारे चार वाजता, संगिता कुटे यांच्या घरासमोर उभी असलेली मारुती सुझुकी अल्टो कार ( एमएच. १६ बी. वाय. ३६४३) वर राहुलने पेट्रोल ओतले आणि काडी लावून कार पेटवून दिली.
यामध्ये कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, फिर्यादीला धमकीही देण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सरोदे करत आहेत.