अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगाव उपनगरातील नागरिकांच्या विजेच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. महावितरण विभागाने यापूव दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे संतप्त नागरिकांनी विभागीय महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पुढाकाराने 3 जुलै रोजी झालेल्या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसात लाईटसंबंधी सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिन्याभराहून अधिक काळ उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. केडगाव परिसरात नव्या वसाहती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. मात्र त्या भागात विद्युत सुविधा अद्याप पोहोचलेली नाही. परिणामी, संपूर्ण परिसर अंधारात असून चोऱ्या, गैरप्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाऱ्यामुळे विद्युत तारांना झाडांच्या फांद्या घासल्यामुळे वारंवार लाईट खंडित होते. पावसाळ्यात या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विद्युत पोल, डीपी पेट्या बसवण्याचे काम अपूर्ण आहे. नागरिकांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. केडगाव परिसरातील लाईटसंबंधी समस्या लक्षात घेता ही कामे पावसाळ्यापूवच पूर्ण होणे अत्यावश्यक होती. मात्र महावितरणच्या दुर्लक्षामुळे ती रखडली असून, परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी उर्वरित कामे पुढील 8 दिवसांच्या आत काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनात अजित कोतकर, सोन्याबापू घेबुंड, सुमित लोंढे, विजय सुंबे, आण्णासाहेब शिंदे, ओंकार कोतकर, अक्षय विरकर, सुहास साळुंखे, बाळु कोतकर, संकेत वाघमारे, पप्पु पाठक, संकेत शिंदे, ऋषी गवळी, योगेश आंबेकर, शुभम गायकवाड, शुभम आंबेकर, शुभम लोंढे, शिवम आरुण, श्रीनाथ टकले, करण ठोंभरे, स्वराज भोसले, अनिकेत लोंढे आदींसह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
महावितरणचे नवे आश्वासन
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केडगाव उपनगरातील लाईटसंबंधी सर्व प्रश्न माग लावण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात येईल, आणि कामाचे नियोजन करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र याआधी देखील अशाच प्रकारचे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न झाल्याने नागरिकांनी या आश्वासनावर शंका व्यक्त केली आहे.
स्मार्ट मीटरमुळे ‘स्मार्ट त्रास’
महावितरणने केडगाव परिसरात स्मार्ट मीटर बसवले असून त्यामुळे नागरिकांच्या वीजबिलांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. महावितरणने चुकीची बिलं दुरुस्त करून दिली जातील असे सांगितले होते. मात्र अद्याप एकाही ग्राहकाचे बिल कमी झालेले नाही. नागरिकांनी स्मार्ट मीटर हटवण्याची मागणी केली आहे.