अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट देत पाहुणचार घेतला. घरातील वारकरी संप्रदायाचे वातावरण पाहून सुखावलेले भिडे गुरुजी यांनी पांडुरंगाच्या मूतचे दर्शन घेत समाधान व्यक्त केले. वारकरी संप्रदाय जपणाऱ्या जगताप कुटुंबासारखा वारसा सर्व राजकीय नेत्यांनी जपावा, अशा भावना व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांना भविष्यातील सुयश चिंतले.
जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे भिडे गुरुजींचे फुलांच्या पायघड्या अंथरून व पाय धुऊन स्वागत केले. तसेच जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सुवर्णा जगताप व माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी औक्षण केले. यावेळी जगताप परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून भगवा पताका खांद्यावर घेत नित्याने वारी करत असल्याचे सचीन जगताप यांनी सांगून आजोबा बलभीमराव जगताप व वडील अरुणकाका जगताप यांचे कार्य थोडक्यात सांगितले.
यावेळी आराध्य जगताप याला हा वारकरी संप्रदायाची परंपरा अशीच पुढे अखंडितपणे चालव असा सल्लाही भिडे गुरुजींनी दिला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, धारकरी अविनाश मरकळे, प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे, नगर तालुका प्रमुख देविदास मुदगल, प्रवीण पैठणकर, किशन ताकटे, पांडुरंग भोसले, संदीप खामकर, प्रतीक पाचपुते, अमोल वांढेकर आदी उपस्थित होते.