अहिल्यानगर । नगर सहयाद्री
चितळे रस्त्यावरील डी. चंद्रकांत नामक दुकान फोडून 2.50 लाख रूपयांची रोकड लंपास करणार्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अवघ्या काही दिवसांत पुणे विमानतळावरून अटक केली आहे. हे संशयित आरोपी त्यांच्या मुळ गावी बिहारला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना हुशारीने ताब्यात घेण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे व्यापारी वर्गात निर्माण झालेली भीती कमी होऊन एलसीबीचे शहरभर कौतुक होत आहे.
लक्ष्मण राजाराम दुलम (रा. सातभाई मळा, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) यांच्या मालकीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 2.5 लाखांची रोकड चोरून नेली होती. तसेच शेजारच्या हॉटेलमध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना 4 ऑगस्टच्या पहाटे घडली होती. याप्रकरणी दुलम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, सागर ससाणे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भगवान धुळे, अर्जुन बडे यांचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळी जाऊन, तांत्रिक तपास, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास, गुप्त माहिती यांचा योग्य वापर करत संशयित आरोपींचा माग काढला. तपासात हे संशयित आरोपी पुणे विमानतळावरून बिहारकडे पळ काढण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. पथकाने तत्काळ पुणे विमानतळावर धाव घेत संशयित आरोपी मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला सफियाना शेख (20, रा. बौध्दनगर, पत्राशेड, पुणे), असफाक दिलशाद शेख (19, रा. काळेवाडी, पुणे) व निसार अली नजर मोहंमद (36, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांना अटक केली. अटक कारवाईदरम्यान सीआयएसएफच्या निरीक्षक रूपाली ठोके व नियंत्रण कक्षातील दीपक वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संशयित आरोपींनी केवळ अहिल्यानगरच नव्हे, तर पुणे शहरातही एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. विशेष बाब म्हणजे यातील एक संशयित आरोपी सध्या खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आहे व अलीकडेच गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय झाला आहे. संशयित आरोपी असफाक शेख याने चोरीतील 1 लाख 98 हजार 200 रूपये हे रक्कम त्याच्या बहिणीच्या बँक खात्यावर एटीएमव्दारे ऑनलाईन वर्ग केल्याचे कबूल केले आहे. दरम्यान, या तिघांकडून चोरी करण्यापूर्वी संबंधित परिसराची रेकी केली जात होती. चोरी करण्यापूर्वी आपले वाहन रेल्वे किंवा बस स्थानकावर पार्क करायचे, आणि ज्या भागात चोरी करायची त्या भागातील वाहन चोरी करून काम झाल्यानंतर ते वाहन पुन्हा त्याच परिसरात सोडून आपल्या वाहनातून पळ काढण्याची पध्दत त्यांनी वापरत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.