अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. शिवारात एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याप्रकरणी उकल होत असून, पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून गळा दाबून खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळण्यात आला होता. पोलिसांनी पतीला अटक केली असून, त्याचा मेहुणा पसार आहे.
शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास डाउच बु. येथील उंबरी नाल्याजवळ एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. चांदेकसारेचे पोलिस पाटील यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली होती. तपासादरम्यान मयत महिलेच्या हातावर “राहुल बापू” असे गोंदलेले आढळून आले. या धाग्याचा वापर करत पोलिसांनी तपास सुरु केला.
शिर्डीजवळील सावळीविहीर फाट्यावरून संजय ऊर्फ बापू हिरामण मोहिते (३७, रा. धारणगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कौटुंबिक वादातून आपल्या पहिल्या पत्नी वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत-मोहिते (रा. गुमगाव, नागपूर) हिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. या घटनेत त्याला मेहुणा गजानन मोहिते याची मदत मिळाल्याचेही सांगितले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून तेथून पळ काढण्यात आला. संजय मोहिते याचे दोन लग्न झाले होते. पहिल्या पत्नीशी कोर्टात वाद सुरू होता. त्यातूनच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. गजानन मोहिते अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा. पो. निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक दीपक रोठे यांच्यासह पोलीस कर्मचारी बबन तमनर, किशोर जाधव, दीपक रोकडे, गणेश काकडे, यमनाजी सुंचे, प्रवीण घुले, श्रीकांत कुन्हाडे, अशोक शिंदे, इरफान शेख यांनी सहभाग घेतला.