अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात जुन्या कोर्ट प्रकरणातील वैरातून अन्सार रहीम शेख (वय अंदाजे ३५) यांच्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी कोयते, गज व लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अन्सार शेख हे रात्री मित्रांसोबत गप्पा मारत असताना दोन वाहनांतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. अन्सार शेख यांना दोन्ही बाजूंनी घेरून आरोपींनी अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये आरोपींनी अन्सार शेख यांना जाणीवपूर्वक ट्रॅप करून हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अझिझ गुलाब सय्यद, अन्वर गुलाब सय्यद, गुलाब फकीर मोहम्मद सय्यद यांच्यासह १० ते १५ अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हे (भारतीय दंड संहिता अंतर्गत) नोंदवले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या हल्ल्यामागे जुन्या न्यायालयीन वादातून निर्माण झालेले वैर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आणखी काही आरोपी या कटामध्ये सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कामरगाव परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.